खरावतेकर लिखित " डॉ. आंबेडकर" ह्या बाबासाहेबांवरील पाहिल्या चरित्राबद्दल माहिती !
जय भीम ! बाबासाहेबांबद्दल सध्या वाचलेल "डॉ. आंबेडकर" हे पुस्तक, ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य असे की, हे त्यांच्यावरील पहिले चरित्र असल्याचं लेखकाने म्हटलं आहे. जरुर असं असणार कारण ह्या पुस्तकाची पहिली आवृत्ती सन १९४६ मध्ये छापली गेली, म्हणजे बाबासाहेब हयात असताना. त्या काळात आणखी कोणी चरित्र लिहिल्याचे आढळून येत नाही. तानाजी बाळाजी खरावतेकर हे ह्या पुस्तकाचे लेखक ते मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील खरावते या गावचे,तानाजी बाळाजी खरावतेकर हे बाबासाहेबांनंतर कोकणातील पहिले पदवीधर !
६०-६२ पानांचं हे पुस्तक बाबासाहेबांबद्दल बरीचशी माहिती देऊन जातं, जसं की,
१) बाबासाहेबांचा जन्म कुठे झाला, मग पुढे त्यांचं कुठे कुठे वास्तव्य राहिले. म्हणजे महू मध्ये त्यांचा जन्म झाला इथपासून ते मुंबई पर्यंत ते कसे आले त्यात मध्यंतरी ते कुठे होते हे ही वाचनात येते
२) बाबासाहेबांचं अभ्यासप्रेम किती अपार ह्या बद्दल खूप छान माहिती आहे, नवीनच मला कळलं की बाबासाहेब रात्री १० च्या सुमारास झोपत असतं पण रात्री १ वाजता उठून अभ्यासाला बसत आणि नंतर सकाळी फक्त थोडी झोप घेत आणि शाळेत जात असतं ( तुम्हा बऱ्याच जणांना माहिती असेल ही गोष्ट पण मी आत्ताच वाचायला सुरुवात केल्याने मला नव्यानेच ही गोष्ट कळली )
३) अजून एक गोष्ट ती म्हणजे त्यांचा स्वभाव कसा होता, एवढं ज्ञान आणि कर्तृत्व असणाऱ्या माणसाचा स्वभाव कसा होता हे जाणून घेण्याची मला तरी खूप इच्छा होती. लेखक एक प्रसंग सांगतात तो असा की, चवदार तळे सत्याग्रह वेळी आलेल्या लोकसमुदायाची जेवणाची सोय होवू नये म्हणून मनूवाद्यांनी चालकांना राशन मिळणार नाही ह्यासाठी कट रचला, तो सफल ही झाला. त्यामुळे नाईलजास्तव चालकांना जमावाला फुटाणे देण्या शिवाय पर्याय उरला नाही. बाबासाहेबांची गैरसोय होवू नये म्हणून त्यांच्यापुरत जेवण करण्यात आलं... ही बाब बाबासाहेबांना कळताच त्यांनी जेवण करण्यास साफ नकार दिला व सर्व लोकसमुदायाला जे होत तेच त्यांना आणायला सांगितलं !
४) स्वभावातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या मनाला जे पटायचे ते साऱ्या जगाला पटले नाही तरी ते तसे बोलल्यावाचून किंवा वागल्यावाचून राहत नसतं. तसेच ते जवळच्या व्यक्तींसोबत तासंतास गप्पा मारत असायचे पण एखादा कोणी परकेपणा दाखवला तर तेव्हा क्वचितच बोलत असतं.
५) बाबासाहेबांची राजकीय व सामाजिक कारकीर्द काय होती या बद्दल ही छोटी पण छान माहिती आहे. आज आपण बघतो की त्यांना फक्त एका समाजापुरत मर्यादित ठेवलं जातं पण हे टाळण्यासाठी आपण त्यांची कारकीर्द राजकीय आणि सामाजिक दोन्ही वाचून लोकांसमोर मांडली पाहिजे
६) शेवटी एक महत्त्वपूर्ण बाब मला वाटली ती म्हणजे देव आहे की नाही यावर एक छोटा भाग आहे. तो बाबासाहेबांच्या कुठल्यातरी भाषणातील असावा त्यात शेवटी अशी ओळ आहे की "जगात देव असो किंवा नसो त्याचा विचार करण्याची तुम्हाला जरुरी नाही." ह्या वाक्यामागील भावना आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. उगाच देव आहे की नाही ह्या भानगडीत पडण्यापेक्षा त्यावर चर्चेला वेळ देण्यापेक्षा तो वेळ स्वतःसाठी, जवळच्या व्यक्तींसाठी, समाजासाठी, बाबासाहेबांच्या शिकवणी प्रमाणे वागण्यासाठी खर्च केला तर अधिक फायदेशीर होईल असे माझे तरी वैयक्तिक मत आहे.
मी वाचत असताना मला ज्या गोष्टी लोकांसमोर मांडाव्यात असे वाटले त्या इथे आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. अशा बऱ्याच गोष्टी आपण जर वाचल्या, आत्मसात केल्या आणि लोकांना सांगितल्या तर खूप मोठा बदल घडून येऊ शकतो. बाबासाहेब नावाचा ज्ञानाचा हा अथांग सागर आपण पाहिला पाहिजे. त्यातून जे जे शिकता येईल ते शिकलं पाहिजे !
इथवर वाचत असाल तर तुमचे मनापासून आभार 🙏 जय भीम !
Comments
Post a Comment