बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ बाबासाहेबांनी का लिहिला ?


बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ बाबासाहेबांनी का लिहिला ?


सदर माहिती ही विनिमय पब्लिकेशन्स प्रकाशित बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकातून घेतलेली आहे. ( अनुवादक- घनः शाम तळवटकर , प्रा. म. भि. चिटणीस, शां. शं, रेगे )

Buddha and his Dhamma
Buddha and His Dhamma

बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाबद्दल थोडक्यात माहिती...

            डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित 'The Buddha and his Dhamma' हा ग्रंथ बुद्धिझमवर लिहिलेला एक अद्वितीय ग्रंथ आहे."बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनानंतर त्यांचा महान इंग्रजी ग्रंथ 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' प्रसिद्ध झाला. त्या ग्रंथात बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा कोणता अर्थ लावला आहे आणि बौद्ध धर्म म्हणजे काय ? हे विशद केलेले आहे. या ग्रंथाचा मराठी अनुवाद 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' असा आहे. या ग्रंथात ८ खंड, ४० भाग, २४८ उपभाग आहेत. ग्रंथातील जवळपास तीन तृतीयांश भाग त्रिपिटकातून उध्दृत केलेला आहे व अन्य बौद्ध साहित्याच्या माध्यमातून ग्रंथाला वैज्ञानिक दृष्टिकोनातून लिहिले आहे.
            त्रिपिटक म्हणजे ग्रंथांनी भरलेले तीन पेटारे. सुत्तपिटक, विनयपिटक आणि अभिधम्मपिटक त्यांचा समावेश त्रिपिटकात झालेला आहे. बौद्धधर्माविषयी आणि त्यांच्या इतिहासाविषयी ची सुमारे २५० पुस्तके डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या खाजगी ग्रंथसंग्रहात होती.
            ग्रंथाला वैज्ञानिक दृष्टिकोनातून लिहिले आहे. काही नवीन प्रश्न उपस्थित केले आहेत आणि गैरसमज निर्माण करणाऱ्या सिद्धांताची जसे की हिंसा, पुनर्जन्म यांची नवीन दृष्टिकोनातून चर्चा गेली आहे. सिद्धार्थ गौतमाच्या गृहत्यागाच्या बाबतीत पारंपरिक चालत आलेले कारण आजारपण, म्हातारपण आणि मृत शरीर इ. गोष्टी पाहिल्यानंतर गृहत्याग केलेला नसून त्याचे खरे कारण स्पष्ट केलेले आहे.
            पहिल्या खंडाच्या आरंभीच्या तीन भागांचे लेखन करताना अश्वघोषाने लिहिलेल्या बुद्धचरितमधील सर्गांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भरपूर आधार घेतलेला आहे. या ग्रंथात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धवचने, बुद्धांचे शिष्यांबरोबरचे संवाद वगैरेंचे संकलन केले आहे.

ग्रंथ लिहिण्यामागची पार्श्वभूमी....

            "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शेवटचा ग्रंथराज 'बुद्ध आणि त्यांचा धम्म'  होय. हा ग्रंथ लिहिण्यामागची पार्श्वभूमी अशी की, बुद्धाचे चरित्र, तत्त्वज्ञान आणि बौद्ध धर्माचे आचरण यासंबंधी बौद्ध भिक्खूंनी जे स्वार्थासाठी अपप्रचार केलेले आहेत, ते खोडून काढून शुद्ध स्वरूपात बुद्धधम्माचे पुनरागमन करणे. असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर खाजगी बैठकीत आपले विचार व्यक्त करीत असत. ( आंबेडकर ग्रंथ यान, धनराज डाहाट, संकेत प्रकाशन, पृ. २२८ )
ग्रंथ छपाई बद्दल माहिती....
            "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्मावरील आपला महान ग्रंथ The Buddha and His Dhamma या ग्रंथाच्या छपाईची संपूर्ण जबाबदारी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे मुख्य ग्रंथपाल मा. एस. एस रेगे यांच्यावर सोपविली होती. ग्रंथाची छपाई मुंबईतील G. Claridge & co. या प्रेसमध्ये चालली होती. ( समकालीन सहकाऱ्यांच्या आठवणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विजय सुरवाडे, पृ. २४६ )

The Buddha and His Gospel म्हणजेच The Buddha and His Dhamma आहे का ?....

            "नोव्हेंबर १९५१ मध्ये बाबासाहेबांनी 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' ( The Buddha and His Dhamma ) या ऐतिहासिक धम्मग्रंथाचे लिखाण सुरू केले आणि फेब्रुवारी १९५६ मध्ये ते पूर्ण केले. या ग्रंथाच्या प्रथम The Buddha and His Gospel या शीर्षकाखाली कागदाच्या एका बाजूसच छापलेल्या ७० - ८० प्रति त्यांनी काही अभ्यासू व विद्वान लोकांच्या अभिप्रायासाठी वितरित केल्या होत्या." ( समकालीन सहकाऱ्यांच्या आठवणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विजय सुरवाडे, पृ. १२ ) त्या प्रती कोठे कोठे व कोणाकडे पाठवल्या आहेत हे सांगता येत नाही.
            'गोस्पेल' ला ग्रंथाचे अंतिम रूप देताना मृत्यूची चाहूल लागलेली असल्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी घाईघाईने ते काम हातावेगळे केल्याचे जाणवते ऑक्टोंबर मध्ये धर्मांतर करण्यापूर्वी हा ग्रंथ प्रकाशित करावा अशी त्यांची इच्छा होती.
याआधी खाजगीरित्या वितरित केलेल्या आपल्या ग्रंथात आवश्यक तेथे काटछाट करून काही ठिकाणी भर घालून तो 'द बुद्ध अँड हिज धम्म' या नव्या शीर्षकाखाली छापण्याचे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवले.

ग्रंथ प्रकाशित झाल्यानंतर आलेली टीकात्मक मते...

            १९५७ साली The Buddha and his Dhamma ची प्रथम आवृत्ती सिद्धार्थ प्रकाशनने प्रकाशित केल्यानंतर काही टीकात्मक परीक्षणे आलीत. ती अशी - "महाबोधी या भारतातील प्रसिद्ध बुद्धिस्ट मासिकाने आपले मत असे दिले की, 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' हा भयंकर ग्रंथ आहे. कर्मसिद्धांतवरील आंबेडकरांचे विवरण अहिंसेसंबंधीचे विचार आणि बौद्ध धर्म हे सामाजिक तत्व आहे हे त्यांचे मत, हे बौद्ध धर्माचे शुद्ध विवरण नवे ते नवीन मत आहे. ग्रंथपरीक्षणकर्ता
म्हणाला, 'खरे सांगावयाचे म्हणजे हा ग्रंथ जे नवबौद्ध आपल्या मनात द्वेष व आक्रमक वृत्ती बाळगतात नि दाखवितात त्याचे विवरण आहे.' तो ग्रंथपरीक्षणकर्ता पुढे म्हणाला, 'आंबेडकरांचा बौद्धधर्म हा द्वेषावर आधारलेला आहे आणि बुद्धाचा धर्म करुणेवर अधिष्ठित आहे. आंबेडकरांच्या ग्रंथातील बुद्धाचे शब्द कोणते आहेत याविषयी जागरूक राहणे हे अधिक महत्त्वाचे कामआहे असे दिसते.' तो टीकाकार पुढे म्हणाला, 'या ग्रंथाचे नाव 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' असे न ठेवता 'आंबेडकर आणि त्यांचा धम्म' असे ठेवावे. कारण धर्मच नाही तो आंबेडकरांनी धर्म म्हणून राजकीय आणि सामाजिक सुधारणेच्या हेतूने उपदेशिला आहे. ( The Maha Bodhi, December 1959 ) रंगून येथील 'लाईट ऑफ धम्म' या मासिकाने आपले मत असे दिले, की हा ग्रंथ एका महापुरुषाने लिहिला आहे. परंतु दुर्दैवाने तो ग्रंथ महान नाही. ग्रंथकर्त्याच्या अंगी अनेक सद्गुण असले, तरी हा ग्रंथ लिहावयास हा ग्रंथकर्ता पात्र नाही. आंबेडकरांनी त्या ग्रंथाच्या मूळ सूत्रात सुद्धा ढवळाढवळ केली आहे आणि जेव्हा जेव्हा बौद्ध धर्मातील मते त्यांना आपल्या मनात गैरसोयीची वाटली आहेत ती बौद्ध धर्मातील मते भिक्षूंनी घुसडली आहेत असे म्हणून ग्रंथकर्त्याने त्यांचा धिक्कार केला आहे. तथापि ग्रंथकार हा एक महान आणि चांगला मनुष्य होता. या ग्रंथाची शोकांतिका अशी आहे की, तो ग्रंथ महानहि नाही आणि चांगलाही नाही( The light of Dhamma ) असे टीकाकारांनी अभिप्राय व्यक्त केले आहेत." ( डॉ. बाबासाहेब आंबेडकर धनंजय कीर, पृ. ५७८ - ५८९ )
             ही परिक्षणे आल्यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर जर हयात असते तर त्यांनी या टीकाकारांचा खरपूस समाचार घेतला असता आणि त्यांना चर्चेसाठी जाहीर आवाहन देखील केले असते.

ग्रंथाबद्दल बाबासाहेबांचे शब्द...

             २४ मे १९५६ भगवान बुद्ध परिनिर्वाण महोत्सवानिमित्त भारतीय बौद्धजन समितीतर्फे नरे पार्कवर प्रचंड सभा झाली. त्या सभेत बाबासाहेब सांगतात, "गेली पाच वर्षे मी मी बौद्ध धर्मावरील एक पुस्तक लिहिण्यात गुंतलो होतो. त्या पुस्तकाचे प्रकाशन माझ्या धर्मदीक्षेअगोदर वैशाख महिन्यात व्हावे या हेतूने मी मुंबईला आलो. परंतु मी एका विलक्षण आजाराने जायबंदी झाल्यामुळे मला ते पुस्तक लवकर लिहून संपविता आले नाही. पुस्तकाची ७०० पाने असून तो ग्रंथ इंग्रजी भाषेत असल्यामुळे आपल्यापैकी बऱ्याच जणांना तो समजणे अवघड जाईल. म्हणून मी लवकरच त्याचे मराठी भाषांतर करून घेणार आहे. केवळ याच कामामुळे मला रंगूनला जाता आले नाही...... तथापि माझ्यासमोर जमलेला हा जनसमुदाय पाहून मला अत्यंत आनंद होत आहे." "माझे हे बौद्धधर्माचे वेड फार पुरातन काळापासूनच आहे. वास्तविक १९५५ सालच्या खानेसुमारीत तुम्हाला सर्वधर्मीय व पंथाचे लोक आढळतील पण उभ्या भारतात एकही बौद्धधर्मीय माणूस या खानेसुमारीत तुम्हाला आढळणार नाही." "बौद्ध चरित्रावर मी जे पुस्तक लिहिले आहे त्यांत बौद्धांचे स्थान काय आहे, याचे संपूर्ण विवेचन केले आहे. ख्रिश्चन धर्मात येशू स्वतःला ईश्वराचा पुत्र समजतो. किंबहुना तो बायबल मधून असेही सांगतो की, मी तुम्हाला ईश्वराचा संदेश सांगत आहे. तुम्ही मेल्यानंतर जेव्हा स्वर्गात जाल तेव्हा मला तुमची परमेश्वराकडे शिफारस करावी लागेल, तेव्हा मी पृथ्वीवर असताना तुम्ही मला ईश्वराचा पुत्र मानत होता काय ?
             मुसलमान धर्माच्या महंम्मद पैगंबराची तिच स्थिती आहे. महंम्मद सुद्धा स्वतःला ईश्वराचा प्रेषित समजतो. पण भगवंतांच्या उपदेशात तसा आशय नाही. भगवंतांनी सांगितले केवळ मी सांगतो म्हणूनच नव्हे तर तुमच्या विचार शक्तीला पटेल तरच त्याचे ग्रहण करा. बुद्धांनी शोधून काढलेला मार्ग हा स्वप्रयत्नाने, स्वकष्टाने व स्वध्यायनाने तयार केलेला आहे. कुणा दुसऱ्याच्या पुंजीवर भगवंतांचा धर्म आधारलेला नाही." "मी माझे धर्मांतर या ऑक्टोंबर मध्ये मुंबईत करणार आहे. त्यापूर्वी या धर्मावर माझे एक पुस्तक मी प्रसिद्ध करणार आहे. भगवंतांच्या बुद्धधर्मात जे वैगुण्य आहे त्याचा सविस्तर विचार मी त्या पुस्तकात मांडणार आहे." ( प्रबुद्ध भारत अंक पंधरावा 2जुन 1956 एक वचार ) 

ग्रंथात अद्भुत कथा आणि छायाचित्रे असण्याचे कारण...

              बौद्ध धर्मग्रंथातही काही अद्भुत कथा आढळतात. 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' हा ग्रंथ लिहिताना त्याच्या पहिल्या दोन खंडांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चमत्काराच्या कथा वगळल्या नाहीत. त्याबाबत प्रा. चिटणीसांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना प्रश्न विचारला तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, 'अरे, माझे लोक यायचे आहेत. पांडवप्रताप वाचून, पठण करून. त्यांना थोडं अद्भुत दाखवीत आणलं पाहिजे ना ! आणि जे काही अद्भुत आणि चमत्कारिक किंवा रोमॅंटिक आहे ते त्यांच्यामधल्या कलासक्तीला उत्तेजन दिल्याशिवाय राहणार नाही.
              सदर ग्रंथ आणखी आकर्षक दिसावा व बुद्धांच्या जीवनाचे चित्रमय दर्शन जनतेला मिळावे यास्तव तथागत बुद्धांची छायाचित्रे यात समाविष्ट केलेली आहेत. मुखपृष्ठावर जो फोटो आहे ते चित्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना चित्रकला शिकवणारे 'मेस्सी' नावाचे चित्रकार यांनी बाबासाहेबांच्या सूचनेनुसार काढलेले ते चित्र आहे. ते मूळ चित्र आधुनिक पद्धत वापरून रंगीत करून मुखपृष्ठ आकर्षक केलेले आहे व ते मूळ चित्र देखील या ग्रंथात समाविष्ट केले आहे.
             डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या ग्रंथाचा हिंदी अनुवाद भदंत आनंद कौसल्यायन यांनी केला असून तो प्रथम १९६१ साली प्रसिद्ध झाला.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Trisaran-Panchshil and it's Marathi meaning | त्रिसरण पंचशील व मराठी अर्थ

Jaymangal And It's Marathi meaning | जयमंङ्गल अठ्ठगाथा व मराठी अर्थ

Bhim Stuti | भीम स्तुती व मराठी अर्थ